दादा कोंडके या माणसाबद्दल मला लहानपणापासूनच खूप उत्सुकता होती आणि त्यातच त्यांचं आत्मचरित्र असणारं "एकटा जीव" हे पुस्तक माझ्या नुकतंच वाचनात आलं.
प्रत्येक नाण्याला जश्या दोन बाजू असतात तश्या प्रत्येक नटाच्या आयुष्याला सुद्धा दोन बाजू असतात ,एक म्हणजे पडद्यावरची आणि दुसरी खासगी. सहसा काही मंडळींच्या खासगी आयुष्याबाबत अनेक तर्कवितर्क असतात,तसेच दादांच्या आयुष्याबद्दल पण मांडले गेले पण चित्रपटांच्या पलीकडचे दादा कोंडके कसे होते हे आपल्याला या पुस्तकात पाहायला मिळत.लेखिका अनिता पाध्ये यांनी दादांच्या शैलीत ह्या पुस्तकात शब्दांकन आणि लेखन केलं आहे त्यामुळे साक्षात दादा कोंडकेच आपल्याशी बोलतायेत असं वाटत आणि हेच अनिता पाध्ये यांचं यश आहे असं म्हणायला हरकत नाही. विविध चित्रपट बनवताना आलेल्या अडचणी,मिळालेले यश ,वेगवेगळ्या घटना यांचं वर्णन तर यात आहेच पण त्या सर्व गोष्टींपलिकडे जाऊन यात वर्णन केलाय तो शेवटी शेवटी दादा कोंडकेनी सहन केलेला "एकटेपणा" आणि तो मनाला चटका लावून जाणारा असा आहे आणि म्हणूनच या पुस्तकाचा नाव एकटा जीव ठेवलंय असं अनिता पाध्ये यांनी नमूद केलंय. पुस्तकात दादा त्यांच्या आयुष्यातील एकटेपणा विषयी म्हणतात ,
"माझं दुःख एकटेपणा मी सहसा कुणाला जाणवू देत नाही.
त्यामुळे मी एकटा मजेत जगतो अशी बऱ्याच जणांची समजूत आहे.
एकटेपणाच्या बदल्यात देवाने मला पैसा,प्रसिद्धी,यश भरपूर दिलं, सर्वांना आयुष्यात मनासारख्या गोष्टी मिळत नाहीत अशी मी स्वतःचीच समजूत घालत असतो.
पुढच्या जन्मी देवाने मला पैसा,प्रसिद्धी,यश काहीही दिलं
नाही तरी चालेल पण ,एकटेपणा देऊ नये. माझी म्हणता येतील अशी माणसं द्यावीत हीच माझी इच्छा आहे"
या वाक्यांवरून आपल्याला दादांच्या खासगी आयुष्याची कल्पना येऊ शकेल...
©मिहीर कुलकर्णी
No comments:
Post a Comment