प्रवासात नेहमी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे लोक भेटत असतात ,काही आपल्याला कमी वेळात आपलेसे होऊन जातात तर काही लोक आपल्याला सर्व प्रकारच्या त्रासाने हैराण करून सोडतात. काल गाडी खराब क्साल असल्यामुळे बस ने कॉलेज ला जावं लागलं ,धायरी ते डेक्कन असा साधारणपणे पाऊण तासांचा पीएमटी बस चा प्रवास . धायरी फाट्याला बसलो तेव्हा साधारणतः मारुती मंदिरापासून बस आधीच भरून आली होती आणि फक्त उभा राहता येईल एवढी अत्यल्प जागा शिल्लक होती. पूढे जसा जसा राजाराम पूल क्रॉस केला तशी गर्दी थोडीशी नमो होऊन बसायला जागा मिळाली आणि बसायला जागा मिळाली म्हणून मी मोबाईल उघडून त्यात फेसबुक चेक करत बसलो असताना शेजारून कोणतरी जरा जास्तच डोकावतय याची मला जाणीव होत होती. एक दोन वेळा दुर्लक्ष केल्यानंतर सुद्धा एका वेळेनंतर मलाच ते कसतरी वाटल्यामुळे मी त्याच्याकडे बघितलं तर क्षणभर त्यानी नजर दुसरीकडे वळवली. किंबहुना आता मला त्याच्या डोकावून बघण्याचा त्रास होऊ लागलाय हे समजलं असावं. मी बघितल्यावर मिश्किल हसत "मोबाईल चांगला आहे ओ" अस म्हणून त्याने वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.
नंतर त्याचा मोबाईल बळच मला दाखवत "सारखा हँग होतो हो ,काय करावं कळेना बघा" . आता या अश्या प्रश्नाला पटकन आपण कस रिऍक्ट व्हावं मी नुसतं "हं" किंबहुना आता त्याला मला त्याच्या मोबाईल मध्ये काही रस नाही हे लक्षात आलं असावं. गाडी एक एक स्टॉप वर थांबत आता पु.ल देशपांडे गार्डन च्या जवळून पास झाली ,तसा तो खिडकीतून बोट दाखवत "ती बघा ती तिकडे आहे ना ती जनता वसाहत!" ती ती अस करून मला जनता वसाहत कडे बोट करून दाखवू लागला. वास्तविक मला ती जनता वसाहत आहे हे माहिती होत तरी मी आपलं त्याच्या हो ला हो लावलं ,इथेही आपल्याला समर्पक प्रतिसाद मिळत नाहीये हे बघून त्याने पुन्हा एकदा विषय बदलावा हे मनोमन ठरवलं असणार. इतक्यात एक स्टॉप वर एक काका त्यांच्या दोन छोट्या मुलांना घेऊन चढले आणि माझ्या पलीकडे असलेल्या रिकाम्या सीटवर बसले ,आणि मी एकटाच का सहन करू आता हे काका आले म्हणजे निदान माझ्या सहन करण्यात तरी कोणीतरी वाटेकरी झाला म्हणून मी निश्वास टाकला ,पण पुढे काय काय ऐकावं लागणार होतं याची मला कल्पना नव्हतीच.
थोड्या वेळानंतर त्याने मला विचारलं "कोणतं कॉलेज ? फर्ग्युसन का ?" या प्रश्नावर मी फक्त मन डोलावून हो म्हणलं ,तर त्याने लगेच सुरू केलं ,"मी पण होतो तिकडं पण काय झालं लै लफडी केली ओ ,शेवटी प्रिन्सिपल नी काढून टाकलं" मग काय नाही बघा लगेच शेजारी एमएम ला घेतली अन बीकॉम झालो बघा. आता फर्ग्युसन ला कॉमर्स फॅकल्टी नाही हे मला माहिती असणार याची त्याने कल्पना ही न करता वरच विधान ठोकून दिलं होतं. मग मी म्हणलं आता काय करता? पुढे शिकताय की नोकरी वगरे करता?? हा इथं जेएम रोड ला एका मोबाईल शॉपी मध्ये लागलोय बघा दोन तीन महिनेच झाले लागून आता मात्र मस्त चालुये ,बारा हजार रुपये मिळतात त्यात निघतो महिना चैनीत " चांगलय की मी म्हणालो. आता तरी हा गप्प बसेल अस वाटून मी मात्र खिडकीतून बाहेर बघायला सुरू केलं ..
काही क्षण शांततेत गेल्यावर त्याने पुन्हा प्रश्न विचारायला सुरुवात केली .
-एक विचारू का?
-हा विचारा
-ते मला बाहेरून एम.कॉम करता येईल का?
-येईल की
-मग ते शिवाजी युनिव्हर्सिटी ची डिग्री नाही ना मिळत?
-नाही हो पुणे युनिव्हर्सिटी मधून केलं तर याच युनिव्हर्सिटी ची मिळणार,
-हा मग चालतय ,
-मग ते युनिव्हर्सिटी मध्ये जावं लागेल का?
-हो !
-च्यायला त्या युनिव्हर्सिटी मध्ये जायला नको वाटत बघा
- का हो ?
-अहो तिथे गेलो अन नागराज मंजुळे नी बघितलं तर संपलो मी
-संपलो म्हणजे?
-अहो त्यांनी बघितलं अन घेतलं वगरे पिक्चर मध्ये तर उगाच हिरो वगरे व्हायचो ,इथं कामातून वेळ मिळेना हिरो वगरे काय होताय??
आता मात्र मला आणि शेजारी बसलेल्या काकांना हसू आवरेना झालं पण आम्ही कसंबसं ते कंट्रोल करत होतो.त्यावर याने नागराज मंजुळे शी याची आधी कशी ओळख् कशी व कुठून झाली ,त्यांचे किस्से सांगायला सुरुवात केली. आता हा विषय बदलायचा म्हणून शेजारच्या काकांनी काय ओ कुठले तुम्ही असा एक प्रश्न छेडून नवा विषय सुरू केला आता एव्हाना गाडी पण शास्त्री रोड वर पोहोचली होती.
- आम्ही परळी चे
-परळीत कुठे ?
-वैजनाथ ओ
-अहो परळी म्हणालात ना अत्ता वैजनाथ
-तेच ते परळी वैजनाथ
-बरं
-तुम्हाला मुंडे महितीयेत का?
-हो
-मग आम्ही पण मुंडेच
-पाहुणे का त्यांचे ?
-नाही ,पण एकदम घरच्यासारखी ओळख
तुम्हाला सांगू का? हे वाक्य ऐकलं आणि आता पुन्हा हा काहीतरी नवीन विषय सुरू करणार हे ओळखून मी आणि ते काका दोन स्टॉप अलीकडेच चला आमचा स्टॉप आला अस म्हणून उतरुन आपल्या स्टॉप कडे चालत जाणं पसंत केलं.उतरल्यावर त्या काकांनी माझ्याकडे बघून आणि मी त्यांच्याकडे बघून एक प्रकारचा सुटकेचा निःश्वास टाकल्याचे एक्सप्रेशन्स दिले आणि आपापल्या कामाला निघून गेलो.
© मिहीर कुलकर्णी