Tuesday, 15 January 2019

खंडेराव

खंडेराव ,
"तर तुमचा ही दुनियदारीशी संबंध आलाच म्हणायचा ! चिअर्स.. "

हातातला ग्लास उचलत तो म्हणाला.

"दुनियादारी , म्हणजे ?"

"मतलब आप भी बखुबी जानते हो जनाब "

"खैर छोडो , झालं गेलं संपलं ,बघा आता नवीन "

"नको नवीन !"

"का?"

"आता भीती वाटते रे ,हे प्रेम वगरे"

"भीती (मोठ्याने हसत ) यात भीती कसली वाटायची खंडेराव .असो अजून एक पेग घेणार ? "

" हो ... एक का दोन घेईन"

"That's the spirit . एक सांगू का खंडेराव ? "

"काय ?"

"माणूस सगळ्यात जास्त कशाला घाबरतो ?? "

"कशाला ?"

"तुम्ही म्हणाल प्रेमाला ?"

"हो ,मग अजून कशाला घाबरतो ?"

"प्रेमापेक्षा ही माणूस कशाला घाबरत असेल ना .. तर तो घाबरतो मृत्यूला ..."

"हो हे खरंय "

"पण मी नाही घाबरत मृत्यूला का विचारा ??"

" का ?"

"कारण मी जिवंतच नाहीये , हा हा हा. ( जोरजोरात हसू लागतो)

इतक्यात खंडेरावांची नजर त्याच्या उलट्या पायांकडे जाते अन खंडेराव च्या डोळ्यासमोर अचानक अंधारी येते. जेव्हा डोळ्यांसमोरची अंधारी दूर व्हायला लागते अन हळूहळू दृष्टी येते तेव्हा खंडेराव डोळे उघडतो आणि फक्त एका हाताने तो अजूनही मातीत नीट पुरला गेला आहे की नाहीे ते बघतो अन पुन्हा कुस बदलून मातीत विलीन होऊन जातो....

-- मिहीर

Saturday, 5 January 2019

चुकून घडलेल्या अपघाताची गोष्ट

Latte ??
नको ..
मग Mocha ??
नको ..
मग आपली नेहमीची frappe??
Ummm आज वेगळी ट्राय करायची का ?
दरवेळी आपण असंच म्हणतो अन शेवटी Frappe वर येऊन आपली गाडी थांबते!
Hehe हो नं! बरं ऐक ना कसलं भारी कॅफे आहे ना हे ?
होय ,म्हणूनच तर आज येऊ म्हणलं ना तुला इकडे.बरं ते सोड ते त्या दिवशी
तू अजून त्या दिवशीच धरून बसलाय (डोक्यावर हात मारत). मला वाटलं एवढ्यात सोडूनही दिलं असशील.
सोडून?? इतकं सोपंय का ते ?
का नाहीय?
तुझ्यासाठी एकवेळ ती casual गोष्ट असेलही पण माझ्यासाठी नक्कीच नाहीये. पुन्हा याची कारणं मला विचारू नकोस , ती तुला चांगलीच माहितीयेत.
हो माहितीयेत.
मग तरीही ?
हो तरीही , त्या वेळेची परिस्तिथी अन मनस्थिती दोन्ही गोष्टी वेगळ्या होत्या. अन तुला मी दुसऱ्या दिवशीच सकाळी म्हणाले होते की तो फक्त एक अपघात होता बाकी काहीही समजू नकोस!
का समजू नको? अन अपघात होता ? हे बरंय ..
जे काय अपघात वगरे होतात ते माझ्याबरोबर च का? की माझ्याबरोबर झाला म्हणून अपघात? दुसरा कोण असता तर त्याच्यासोबत झाला तर ते प्रेम किंवा अजून काही पण माझ्यासोबत झाला तर अपघात??
आता तू वेगळीच री ओढून गैरसमज करून घेतोयस, अस नाही का वाटत तुला?
गैरसमज ! यात कसला आलाय गैरसमज??
मग गैरसमज नाही तर काय म्हणणार? 
हे बघ मी मान्य करायला तयार आहे की त्या दिवशी जे काही झालं तो एक अपघात होता वगरे पण मी मान्य का करावं किंवा तू ही का असं अपघात वगरे नाव देऊन त्याला पळवाट शोधतेय?? 
हे बघ आता तुझा इगो वगरे आड येतोय हा..
इगो ! तो कितीही असला तरी तो तुझ्याबाबत कधीच आड आला नाही आत्तापर्यंत अन हे तुला चांगलंच माहितीय.
खरंतर आज बऱ्याच दिवसांनी भेट होईल ,खूप काही काही बोलायचं होतं तुझ्यासोबत..
मग बोल की , मी कधी नाही म्हणलं?? 
जाऊदे आता मला सुचत ही नाहीये .. 
सर कॉफी... वेटर ने 2 frappe आणून ठेवल्या तश्या त्या कॉफीकडे बघत सिप करत मी क्षणभर त्या कॉफीकडेच तंद्री लागल्यासारखा बघू लागलो . माझा लागलेली तंद्री एव्हाना तिला समजली असावी . तिने एक कॉफी अन माझ्यामध्ये एक चुटकी वाजवली तसा मी खाडकन तंद्रीतून बाहेर आलो.  
हा बोल आता ! 
थांब जरा ,सुचत नाहीये सुचलं की बोलतो ..
बरं , as you wish ..
दोघेही एकमेकांना बघत कॉफी सिप करू लागतात. एकमेकांकडे बघताना पण असं की दुसऱ्याला लक्षात येणार नाही . तेवढ्यात सॅक च्या पुढच्या कप्प्यात हात टाकून मी शोधू लागतो, काय शोधतोय अश्या प्रश्नार्थक नजरेने आता ती माझ्याकडे बघायला लागते.
काय शोधतोय ??
काही नाही. 
सांग ना . 
सिगरेट शोधतोय .
सिगरेट ! तू सिगरेट ओढतोस 
हो कधी कधी विशेषतः जेव्हा मला काही सुचत नाही किंवा एकटा वाटतं तेव्हा ओढतो
म्हणजे तुला आता एकटा वाटतंय तर ,ठीक आहे मी जाते मग..
मी काय म्हणलं ते समजलं नाही का तुला? 
काय समजलं नाही? 
एकटा वाटतं किंवा काही सुचत नाही तेव्हा. 
हा मग तेच ना आता एकटं वाटतंय ना तुला?
नाही ,सुचत नाहीये 
तेवढ्यात पावसाचे बारीक थेंब पडायला सुरुवात होते अन काही क्षणानंतर मोठा पाऊस येऊ लागतो तसा मी पेटवायला घेतलेली सिगरेट मी बॅग मध्ये टाकून आम्ही दोघेही कॅफे मधल्या आतल्या टेबल वर जाऊन बसतो ,त्यातही खिडकी शेजारचं टेबल हवं असा तिचा आग्रह . 
भेंचो या पावसाला ही आत्ताच कोसळायच होतं! 
असुदे रे .. 
असं म्हणून ती कॅफे च्या खिडकीतून पाऊस बघू लागते काही वेळात ती पाऊस बघण्यात इतकी हरवून जाते की तिला तिथे मी आहे किंवा ती कॅफे मध्ये बसून पाऊस बघतेय हे सगळं विसरायला होतं. तिला तस बसलेला पाहून माझा ही राग हळूहळू कमी व्हायला लागतो. खिडकीत हाताच्या घडीवर हनुवटी ठेवून पाऊस बघत असताना तिला पाहून क्षणभर तिच्या मोकळ्या लांबसडक केसांवरून हात फिरवत तास अन तास हाताची बोटं फिरवत राहावं असं वाटतं. पण तिला ते आवडेल की नाही ? वगरे यासारखे असंख्य प्रश्न मनामध्ये घिरट्या घालायला सुरुवात करतात, अश्यातच कॅफे मध्ये लागलेली इंग्लिश गाणी बंद करून कॅफे मध्ये आता हिंदी गाणी सुरू झालेली असतात अश्यातच माझं आवडतं "हवाये" गाणं लागतं
"मैं जो तेरा न हुआ,
किसी का नही... किसी का नहीं" 
त्या गाण्यातल्या या ओळी ऐकून का कोण जाणे मला अचानक काहीतरी लिहावंसं वाटतं, म्हणून मी खिशाला असलेलं पेन काढतो अन कागद किंवा लिहायला नोटपॅड वगरे काहीतरी सॅक मध्ये मिळेल अथवा नाही याचा विचार ही न करता मी टेबल वरचा टिशू पेपर उचलतो आणि त्यावर लिहू लागतो 
तिला पाऊस आवडायचा 
अन् मला ती... 
कॅफेच्या खिडकीतून ती 
तास अन् तास पाऊस बघायची
अन् तिला मी .. 
एवढ्या ओळी लिहून झाल्याचं होत्या की तोपर्यंत पाऊस ही कमी झाला होता अन ती ही आता पावसाला विसरून पुन्हा एकदा कॅफे मध्ये मनाने परतली होती. तिने माझ्याकडे पाहिलं आणि मी काहीतरी लिहितोय ते ही टिशू वर हे बघून तिला मला काय लिहितोय हे विचारावं वाटलं असेल पण मी लिहिण्यात इतका हरवलो होतो की तिने माझी लिखाणात लागलेली तंद्री डिस्टर्ब न करण्याच ठरवलं असेल पण मलाच जसा पाऊस थांबला तसं पुढे लिहायचं काही सुचेना म्हणून मी तो टिशू घेतला आणि खिशात टाकला आणि तिला चला जाऊया का? असं हातवारे करतच विचारलं तस तिने ही मान डोलावून होकार दिला आम्ही कॅफे मधून पार्किंग मध्ये गेलो असताना मी जाताना खिशात टाकलेला टिशू तिथे टाकून दिला आणि हेल्मेट घालून तिच्याकडे एकदा बघून येतो असं म्हणून गाडी वर बसून पुढे गेलो मागे बघितलं तर तिने तो कागद उचलला होता अन चुरगळेला कागद तिने सरळ केला तर त्यावर काहीच लिहिलं नव्हतं आणि मी थोड्या लांबून हे सगळं बघत होतो मी ही क्षणभर हसलो आणि निघून गेलो.
त्या दिवशी रात्री तिने मेसेज केला की तू त्या टिशू वर काय लिहिलं होतंस?? 
त्यावर मी म्हणालो भेटलो की सांगेन ! 
भेटलो की काय अत्ता सांग की.. 
नाही ,भेटलो की सांगतो ..
बरं ठिके ,पण भेटणार कधी ? 
भेटू की ! लवकरच ... 
- मिहीर

संध्याकाळ

सूर्य उतरणीला लागायची आणि चंद्राने हळूहळू दर्शन द्यायला लागण्याची वेळ होत होती. थंडी तिच्या परमोच्च काळात असल्याने ,तांबूस अभाळ असतानाच वातावरणात गारठा जाणवू लागला होता. अनेक वेळा नकार देऊन झाल्यानंतर का कोण जाणे आज ती तयार झाली होती ती पण त्याच्या आवडत्या हॉटेल ला यायला. अचानक होकार आल्यामुळे त्याची तारांबळ उडालेली . काय करावं अन काय करू नये याचे अनेक दिवस अनेकांडून घेतलेले सल्ले त्या दिवशी उपयोगी पडणार नव्हते . असंख्य प्रश्न आणि त्यांची येऊ शकतील अशी अनेक समर्पक उत्तरं घेऊन विचारांच्या चक्रव्यूहासकट तो हॉटेल ला ठरलेल्या वेळेच्या आधीच येऊन पोहोचला होता . ती आली तसं काही न बोलता फक्त स्मितहास्य करून त्याने तिला आत जाऊया का अस इशाऱ्याने खुणवल. ती ही इशाऱ्याने होकार दर्शवित तयार झाली.

        बोला ,असं म्हणून त्याने त्याची नजर मोबाईल मध्ये गुंतवून ठेवली तसा बराच वेळ त्याला काहीही प्रतिसाद मिळाला नाही . अधून मधून ते दोघे फक्त एकमेकांकडे बघत "स्मितहास्य " करत पुन्हा शांतपणे बसले होते ,हा मोबाईलमध्ये तर ती एका ठिकाणी शून्यात नजर लावून बसली होती. कालांतराने याने वातावरणात जरा हलकेपणा यावा म्हणून कॉफी ऑर्डर केल्यानंतर ती सिप करत थोड्याबहोत इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्यानंतर पुन्हा जेव्हा दोघेही शांतता शोधू लागली ,तेव्हा खरंतर दोघांनाही ती आवडू लागली असेल . त्याने तिला जवळ घ्यावं ,आणि तिने त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून सगळ्या जगाचा विसर पडत शांतपणे बसून रहावं असं तिला वाटत असणार पण तिने ते त्याला जाणवू नये असे हावभाव चेहऱ्यावर ठेवले पण कालांतराने त्याला हे समजलं असावं त्याने त्याप्रमाणे कृती केली अन ती अगदी निर्धास्तपणे त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून सुखावून गेली..

पुढे कित्येक वेळ ते एकमेकांशी काहीच बोलले नाहीत .

इतके वेळ जणू ते इतके ओळखीचे असूनही अनोळखी होते की जणू काही

अशी कशी ओळख ज्यातील अनोळखीपण संपत नाही
तुला गुणगुणत असतानाही तुला ऐकणे राहून जाते

अस वाटावं , पुढे पुन्हा हे गाणं वाजू लागत आणि त्याचे बोल त्यांच्या त्या परिस्तिथीला अगदी सार्थ ठरतात

शब्दांमधुनी झरे शांतता, अर्थातुनही अनर्थ उरतो
हाताइतके अंतर असुनी, हाक मारणे राहुन जाते....

- मिहीर

दिवसाच्या एखाद्या प्रहरी
वडापिंपळाखाली बसल्यावर
सुचलेल्या अनेक कवितांमध्ये
जाणवणाऱ्या तुझ्या अस्तित्वाची
मला बसणारी झळ
किंवा व्याकरणदृष्ट्या चुकलेल्या
अनेक कवितेमधल्या
जुळवलेल्या "ट" ला "ट"
किंवा "र" ला "र" यमकाप्रमाणे
सर्वांनी नाकारलेली
तरी का कोण जाणे मला सुचणारी
तुझ्यावरची ही कविता
कधी सुचायची बंद होणार
हे तूच जाणे
ते बंद होईल तेव्हा होईल
पण तोपर्यंत तुझ्यावर केलेल्या
व्याकरदृष्ट्या चूक बरोबर असलेल्या
किंवा नसलेल्या
जाणून बुजून अनेकदा
यमक जुळवलेल्या या कविता
नक्की कोणत्या वृत्तात बसवायच्या
त्यातून डोकावणाऱ्या तुझ्या अस्तित्वाला
व्याकरणाचे नक्की कोणते नियम लावायचे
हे तूच सांग ना आता
असो .... !

- मिहीर

आठवणींचे उसासे

खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...