Latte ??
नको ..
मग Mocha ??
नको ..
मग आपली नेहमीची frappe??
Ummm आज वेगळी ट्राय करायची का ?
दरवेळी आपण असंच म्हणतो अन शेवटी Frappe वर येऊन आपली गाडी थांबते!
Hehe हो नं! बरं ऐक ना कसलं भारी कॅफे आहे ना हे ?
होय ,म्हणूनच तर आज येऊ म्हणलं ना तुला इकडे.बरं ते सोड ते त्या दिवशी
तू अजून त्या दिवशीच धरून बसलाय (डोक्यावर हात मारत). मला वाटलं एवढ्यात सोडूनही दिलं असशील.
सोडून?? इतकं सोपंय का ते ?
का नाहीय?
तुझ्यासाठी एकवेळ ती casual गोष्ट असेलही पण माझ्यासाठी नक्कीच नाहीये. पुन्हा याची कारणं मला विचारू नकोस , ती तुला चांगलीच माहितीयेत.
हो माहितीयेत.
मग तरीही ?
हो तरीही , त्या वेळेची परिस्तिथी अन मनस्थिती दोन्ही गोष्टी वेगळ्या होत्या. अन तुला मी दुसऱ्या दिवशीच सकाळी म्हणाले होते की तो फक्त एक अपघात होता बाकी काहीही समजू नकोस!
का समजू नको? अन अपघात होता ? हे बरंय ..
जे काय अपघात वगरे होतात ते माझ्याबरोबर च का? की माझ्याबरोबर झाला म्हणून अपघात? दुसरा कोण असता तर त्याच्यासोबत झाला तर ते प्रेम किंवा अजून काही पण माझ्यासोबत झाला तर अपघात??
आता तू वेगळीच री ओढून गैरसमज करून घेतोयस, अस नाही का वाटत तुला?
गैरसमज ! यात कसला आलाय गैरसमज??
मग गैरसमज नाही तर काय म्हणणार?
हे बघ मी मान्य करायला तयार आहे की त्या दिवशी जे काही झालं तो एक अपघात होता वगरे पण मी मान्य का करावं किंवा तू ही का असं अपघात वगरे नाव देऊन त्याला पळवाट शोधतेय??
हे बघ आता तुझा इगो वगरे आड येतोय हा..
इगो ! तो कितीही असला तरी तो तुझ्याबाबत कधीच आड आला नाही आत्तापर्यंत अन हे तुला चांगलंच माहितीय.
खरंतर आज बऱ्याच दिवसांनी भेट होईल ,खूप काही काही बोलायचं होतं तुझ्यासोबत..
मग बोल की , मी कधी नाही म्हणलं??
जाऊदे आता मला सुचत ही नाहीये ..
सर कॉफी... वेटर ने 2 frappe आणून ठेवल्या तश्या त्या कॉफीकडे बघत सिप करत मी क्षणभर त्या कॉफीकडेच तंद्री लागल्यासारखा बघू लागलो . माझा लागलेली तंद्री एव्हाना तिला समजली असावी . तिने एक कॉफी अन माझ्यामध्ये एक चुटकी वाजवली तसा मी खाडकन तंद्रीतून बाहेर आलो.
हा बोल आता !
थांब जरा ,सुचत नाहीये सुचलं की बोलतो ..
बरं , as you wish ..
दोघेही एकमेकांना बघत कॉफी सिप करू लागतात. एकमेकांकडे बघताना पण असं की दुसऱ्याला लक्षात येणार नाही . तेवढ्यात सॅक च्या पुढच्या कप्प्यात हात टाकून मी शोधू लागतो, काय शोधतोय अश्या प्रश्नार्थक नजरेने आता ती माझ्याकडे बघायला लागते.
काय शोधतोय ??
काही नाही.
सांग ना .
सिगरेट शोधतोय .
सिगरेट ! तू सिगरेट ओढतोस
हो कधी कधी विशेषतः जेव्हा मला काही सुचत नाही किंवा एकटा वाटतं तेव्हा ओढतो
म्हणजे तुला आता एकटा वाटतंय तर ,ठीक आहे मी जाते मग..
मी काय म्हणलं ते समजलं नाही का तुला?
काय समजलं नाही?
एकटा वाटतं किंवा काही सुचत नाही तेव्हा.
हा मग तेच ना आता एकटं वाटतंय ना तुला?
नाही ,सुचत नाहीये
तेवढ्यात पावसाचे बारीक थेंब पडायला सुरुवात होते अन काही क्षणानंतर मोठा पाऊस येऊ लागतो तसा मी पेटवायला घेतलेली सिगरेट मी बॅग मध्ये टाकून आम्ही दोघेही कॅफे मधल्या आतल्या टेबल वर जाऊन बसतो ,त्यातही खिडकी शेजारचं टेबल हवं असा तिचा आग्रह .
भेंचो या पावसाला ही आत्ताच कोसळायच होतं!
असुदे रे ..
असं म्हणून ती कॅफे च्या खिडकीतून पाऊस बघू लागते काही वेळात ती पाऊस बघण्यात इतकी हरवून जाते की तिला तिथे मी आहे किंवा ती कॅफे मध्ये बसून पाऊस बघतेय हे सगळं विसरायला होतं. तिला तस बसलेला पाहून माझा ही राग हळूहळू कमी व्हायला लागतो. खिडकीत हाताच्या घडीवर हनुवटी ठेवून पाऊस बघत असताना तिला पाहून क्षणभर तिच्या मोकळ्या लांबसडक केसांवरून हात फिरवत तास अन तास हाताची बोटं फिरवत राहावं असं वाटतं. पण तिला ते आवडेल की नाही ? वगरे यासारखे असंख्य प्रश्न मनामध्ये घिरट्या घालायला सुरुवात करतात, अश्यातच कॅफे मध्ये लागलेली इंग्लिश गाणी बंद करून कॅफे मध्ये आता हिंदी गाणी सुरू झालेली असतात अश्यातच माझं आवडतं "हवाये" गाणं लागतं
"मैं जो तेरा न हुआ,
किसी का नही... किसी का नहीं"
त्या गाण्यातल्या या ओळी ऐकून का कोण जाणे मला अचानक काहीतरी लिहावंसं वाटतं, म्हणून मी खिशाला असलेलं पेन काढतो अन कागद किंवा लिहायला नोटपॅड वगरे काहीतरी सॅक मध्ये मिळेल अथवा नाही याचा विचार ही न करता मी टेबल वरचा टिशू पेपर उचलतो आणि त्यावर लिहू लागतो
तिला पाऊस आवडायचा
अन् मला ती...
कॅफेच्या खिडकीतून ती
तास अन् तास पाऊस बघायची
अन् तिला मी ..
एवढ्या ओळी लिहून झाल्याचं होत्या की तोपर्यंत पाऊस ही कमी झाला होता अन ती ही आता पावसाला विसरून पुन्हा एकदा कॅफे मध्ये मनाने परतली होती. तिने माझ्याकडे पाहिलं आणि मी काहीतरी लिहितोय ते ही टिशू वर हे बघून तिला मला काय लिहितोय हे विचारावं वाटलं असेल पण मी लिहिण्यात इतका हरवलो होतो की तिने माझी लिखाणात लागलेली तंद्री डिस्टर्ब न करण्याच ठरवलं असेल पण मलाच जसा पाऊस थांबला तसं पुढे लिहायचं काही सुचेना म्हणून मी तो टिशू घेतला आणि खिशात टाकला आणि तिला चला जाऊया का? असं हातवारे करतच विचारलं तस तिने ही मान डोलावून होकार दिला आम्ही कॅफे मधून पार्किंग मध्ये गेलो असताना मी जाताना खिशात टाकलेला टिशू तिथे टाकून दिला आणि हेल्मेट घालून तिच्याकडे एकदा बघून येतो असं म्हणून गाडी वर बसून पुढे गेलो मागे बघितलं तर तिने तो कागद उचलला होता अन चुरगळेला कागद तिने सरळ केला तर त्यावर काहीच लिहिलं नव्हतं आणि मी थोड्या लांबून हे सगळं बघत होतो मी ही क्षणभर हसलो आणि निघून गेलो.
त्या दिवशी रात्री तिने मेसेज केला की तू त्या टिशू वर काय लिहिलं होतंस??
त्यावर मी म्हणालो भेटलो की सांगेन !
भेटलो की काय अत्ता सांग की..
नाही ,भेटलो की सांगतो ..
बरं ठिके ,पण भेटणार कधी ?
भेटू की ! लवकरच ...
- मिहीर

No comments:
Post a Comment