भाग ५ :-
काल खरतर मी तिला भेटायला बोलवल्यानंतर तिने हो नाही करत संमती दिली होती,पण ती नक्की येईल की नाही याबद्दल मी साशंक होतो ,पण मला कुठे ना कुठे वाटत होत की ती येईल कारण जशी मला उत्सुकता होती तशी तिलाही असणारच! म्हणून आज भेटल्यावर काय काय अन कसं कसं बोलायचं याच विचारात मी सकाळी उठल्यापासून दिवसभर गुंगून गेलो होतो. अखेरीस संध्याकाळ जशी जशी होऊ लागली तसा माझ्या पोटात गोळा आल्यासारखं काहीतरी होऊ लागलं , भेटीमुळे सहसा असं होत असावं,म्हणून मी शक्य तितकं नॉर्मल राहण्याचा प्रयत्न केला. एरवी माणूस कितीही अजागळ राहत असला तरी कोणत्याही मुलीला भेटायला जायचं म्हणलं कि तो शक्य तितकं चांगलं दिसायचा आवरण्याचा प्रयत्न करतो ,या ला मीही अपवाद नव्हतोच त्यामुळे मी सुद्धा व्यवस्तीत आवरून ठरलेल्या बागेत वेळेच्या आधीच पोहोचलो...
संध्याकाळची पण तरीही अजून मावळतीला न आलेली अशी ती वेळ होती ,मी बागेच्या एका कोपऱ्यातील बाकड्यावर बसून एक पाय दुमडून दुसऱ्या पायावर ठेवून ऐटीत हातातल्या घड्याळात एकदा आणि नंतर समोर खेळत असलेल्या लहान मुलांकडे बघत होतो, आणि त्यांची निरागसता,खोडकरपणा बघून नकळत मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवून गालातल्या गालात किंचित हसत होतो ,अन त्या मुलांचा बॉल चुकून खेळता खेळता माझ्याकडे आला आणि मी तो त्यांच्याकडे टाकायला हळूच खाली वळून बॉल उचलणार तेवढ्यात खाली वाकलेलो असताना मला तिथे हिल्स घातलेले पाय थांबलेले दिसले म्हणून मी वर बघितलं तर तिथे ती होती ते बघून मला दोन मिनिटं मी स्वप्न बघतोय कि काय अस वाटत होत पण नंतर तो चिमुकला बॉल मागायला माझ्याकडे आल्यानंतर मी भानावर आलो आणि तिला बाकड्याकडे हात दाखवून बसायची खूण केली.खरतर मला त्या दिवशी मी भरपूर काही कमावलं असं वाटत होत पण त्याचवेळी आज तीच इथे असण्यासाठी मला करावी लागलेली मेहनत हि मला विसरून चालणारी नव्हती... ती बाजूला बसल्यानंतर मी फक्त तिच्याकडे पाहत होतो..आणि पाहत असताना मला आमचा सगळा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोर फिरत होता एकीकडे तीच ते सौंदर्य आणि भूतकाळ या दोन्हींच संतुलन साधण्यात माझी त्रेधातिरपीट होत होती आणि कदाचित माझ्या चेहऱ्यावरून ती तिला कळली असावी..
"आलीस!"
"हो,पण असं का विचारलं?"
"मला वाटलं होतं कि.."
"काय वाटलं होतं?
"कि तू नाही येणार पण आलीस,बरं वाटलं"
"ये ये बस बस"
या संवादानंतर आम्ही तिथेच एका बाकावर बसलो ,थोडावेळ पुन्हा एकदा आम्हाला काय बोलावे कळेना पण मग शेवटी तिनेच माझ्या मधक्या करिअर बद्दल वगरे विचारायला सुरुवात केली,मग मी पण ती इंजिनीअर असून इंटिरियर वगरे कसं करायला लागली वगरे याबद्दल विचारणा केली आणि मग थोडावेळ हे सगळं बोलल्यामुळे आमच्यात किंचित मोकळेपणा येऊ लागला होता आणि मग आम्हाला दोघांनाही भूक लागल्यामुळे आम्ही कुठल्यातरी हॉटेल मध्ये जाऊया असं ठरवलं आणि माझ्या गाडीतून तिथून जवळच अश्या पण खूप वेळ बसू देत अश्या हॉटेल मध्ये जाऊन पोहोचलो. आम्ही हॉटेल मध्ये पोहोचेपर्यंत साधारणतः जेवणाची वेळ जवळपास होतच अली होती त्यामुळे आम्ही जेवण ऑर्डर केलं आणि पुन्हा आमच्या गप्पा सुरु झाल्या ,मी तिला तिच्या अचानक गायब होण्याचं कारण विचारलं तेव्हा ती काही काळ गप्प राहिली,मला वाटलं की तिला बहुतेक उत्तर द्यायचं नाहीये म्हणून मी विषय बदलण्याचा प्रयत्न केला पण थोड्यावेळाने ती नॉर्मल झालेली बघून मग आम्ही परत गप्पा मारायला सुरु केल्या.. पणतो प्रश्न तिने का टाळला मला अजूनही नाही कळलं आणि मग मी ठरवलं की आज काहीही झालं तरी या प्रश्नाचं उत्तर आपण मिळवायचंच ...
(क्रमश:)
©मिहीर कुलकर्णी
No comments:
Post a Comment