सामान्यतः मराठी माणसांच्या असणाऱ्या श्रीमंतीच्या व्याख्या या साधारणतः मोठं घर ,आलिशान गाड्या ,झालंच तर घरामध्ये एखादा स्विमिंग पूल,वगैरे वगैरे. नेमकं हेच चित्र राजवाडे अँड सन्स मध्ये आपल्याला पहायला मिळतं.
सचिन कुंडलकर हा चित्रपटसृष्टीला लाभलेला एक ताकदवान दिग्दर्शक आपल्या लेखणीतून आणि तितक्याच सुंदर दिग्दर्शनातून ही कलाकृती आपल्यासमोर उभी करतो आणि आपल्याला एका Fantasy वर्ल्ड मध्ये घेऊन जातो. तसा Fantasy हा सचिन कुंडलकर यांच्या सिनेमांचा मुख्य गाभा असतो ,आपण जसं आयुष्य जगत नाही ,किंवा आपल्या आयुष्य जगण्याविषयीच्या ज्या कल्पना असतात ,नेमक्या त्याच सचिन कुंडलकर यांची पात्र त्या स्क्रीन वर जगत असतात म्हणून आपल्याला ती पटकन भावतात.
राजवाडे अँड सन्स ची कथा आहे ती पुण्यामध्ये राहत असलेल्या एका राजवाडे कुटुंबाची. कुटुंब प्रमुख असणारे रमेश राजवाडे (सतीश आळेकर) त्यांच्या पत्नी सुशीला राजवाडे (ज्योती सुभाष) त्यांची मुलं शुभंकर राजवाडे (अतुल कुलकर्णी), विद्याधर राजवाडे (सचिन खेडेकर) त्यांची बहीण लक्ष्मी ( मृणाल कुलकर्णी) आणि तिचा नवरा वैभव ( राहुल मेहेंदळे) , हे त्यांच्या वडिलांनी म्हणजेच रमेश राजवाडे यांनी त्यांना आखून दिलेल्या प्रमाणे साचेबद्ध आयुष्य जगत असतात.
पण या उलट त्यांच्या मुलांना म्हणजेच अनय (आलोक राजवाडे) ,श्वेता (कृतिका देव) ,विराजस (सिद्धार्थ मेनन) ,अनन्या (मृण्मयी गोडबोले) यांना फॅमिली बिझनेस व्यतिरिक्त ,आयुष्यात वेगळं काहीतरी करायचं असत. चित्रपटाची सुरुवातच होते "तगमग" या गाण्याने या गाण्यात राजवाडेंच्या जुन्या वाड्यात जिथे काही दिवसांनी नवीन कमर्शिअल काँप्लेक्स होणार असत त्या वाड्यात जाऊन ही मुलं त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या काही विचित्र फॅन्टसीज अक्षरशः जगतात ,त्यांच्या या फॅन्टसीज च अर्जुन सोरटे या कॅमेरामन नी केलेलं चित्रण आणि या या चित्रणाला असलेल देबाप्रितो आणि एड्रियन डिसुझा च म्युझिक अप्रतिम आहे.
सगळं काही सुरळीत चाललेलं असताना अचानक राजवडेंच्या तिसऱ्या मुलाची म्हणजेच विक्रम राजवाडे याची एन्ट्री होते. विक्रम हा काही वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला असतो ,त्याच अचानक येणं सर्वांना आश्चर्यचकित करत तर त्याच्या वडिलांना ते अजिबात आवडत नाही ,त्याच काही बरं चाललेलं नाही म्हणून पैसे मागायला आला असेल असं म्हणून ते त्याला त्याच्या हिश्याचा चेक देऊ करतात पण तो चेक तो नाकारतो आणि इथून चित्रपटाच्या रंजकतेला सुरुवात होते आणि पूढे विक्रम त्याच्या आयुष्यात किती यशस्वी आहे हे तो सांगतो ,आणि मुलांच्या मनात असलेल्या गोष्टी त्याने केल्यात किंवा तो करतोय हे पाहून मुलं त्याच्याशी पटकन कनेक्ट होतात.
चित्रपटात दाखवलेली अजून एक कल्पना म्हणजे Duality म्हणजेच एकाच वेळी दोन वेगवेगळी आयुष्य जगणं, ही गोष्ट सिनेमा मध्ये अतुल कुलकर्णी करतोय अस दाखवलं असलं तरी आजकाल समाजात आपल्याला असे अनेक लोक दिसतात ,जे घरात एक अन बाहेर वेगळं अस आयुष्य जगतात. आपल्याला हवं तसं आयुष्य जगणं ही सुद्धा एक प्रकारची फॅन्टसीच असते अन या अश्या वेगवेगळ्या फॅन्टसीज हे राजवाडे मधली सगळी पात्र सिनेमा भर जगतात. विक्रम सगक्या मुलांना त्यांना आवडत ते करण्यासाठी घरच्यांशी कशाप्रकारे डील करायचं हे सांगतो.
सिनेमात एक गोष्ट प्रामुख्याने अधोरेखित केलीय ती म्हणजे श्रीमंत असणं म्हणजेच सुखी असणं अस नसतं ,हे प्रामुख्याने अधोरेखित केलं आहे. प्रत्येक माणसाची सुखाची व्याख्या खूप वेगळी असते अन ती व्यक्ती सापेक्ष बदलत असते ,हे हा चित्रपट दाखवतो. अन म्हणूनच हा चित्रपट वेगळा ठसा उमटवून जातो .
© मिहीर कुलकर्णी

No comments:
Post a Comment