Friday, 20 October 2017

कथा :- फोटो अल्बम


      "बाबा,माझी रॅकेट कुठे ठेवलीय ?? सापडत नाहीये" नीरज बाबांना हाका मारू लागला. बाबा त्यांचं काम चालू असतानाच तिथून
"अरे माळ्यावर असेल बघ, आणि हो स्टूल घेऊन जरा शिस्तीत काढ नाहीतर पडशील"
"हा बाबा काढतो"
नीरज ने आतल्या खोलीतून स्टूल आणला आणि त्यावर चढून माळ्यावर त्याची रॅकेट कुठे सापडतीय का ते बघू लागला. माळ्यावर असलेल्या पसाऱ्यात रॅकेट शोधणं म्हणजे तस जरा कठीणच काम होतं,पण तरीही तो एक एक वस्तू बाजूला ढकलत रॅकेट शोधत असतानाच ,त्याला एक गाठोडं बांधलेलं दिसलं. त्या गाठोड्या मागेच त्याची रॅकेट ही दिसत होती. त्याने ते गाठोडं आणि रॅकेट दोन्ही घेऊन तो स्टूलावरून खाली उतरला आणि स्टूल नेहमीच्या जागी ठेवून खेळायला जायचं ,अश्या बेताने आतल्या खोलीत स्टूल ठेवायला गेला खरं पण त्याच मन त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. ''त्या गाठोड्यात नक्की काय असेल?" हा विचार त्याच्या मनात सतत घोळत होता. त्याने ते गाठोडं उघडून बघण्याआधी बाबांना विचारून बघूया म्हणून पुन्हा बाबांना हाक मारली ,बाबा त्यांच्या हातातलं काम संपवून ५ मिनिटांत येतो म्हणाले आणि बाबा येताच त्याने आतुरतेने बाबांना विचारलं
"बाबा रॅकेट शोधताना ,मला सापडलं हे! काय आहे हो यात?"
"काही जुने फोटो अल्बम आहेत त्यात"
" मला बघायचेत बाबा,आपण बघूया का"
"हो बघूया की"
बाबा त्याच खोलीत असलेला रेडिओ पण चालू करतात ,रेडिओ वर मस्त जुनी गाणी लागलेली असतात.सोबतीला बाबांनी नुकतीच केलेली वाफळलेली कॉफी असा फक्कड बेत असतो. मग सुरू होते ती दोघांची फोटो अल्बम पाहण्याची मैफिल.
पहिला अल्बम असतो तो नीरज च्या आई बाबांच्या लग्नाचा. सहाजिकच साऱ्या लहानमुलांचा आईवडिलांच्या लग्नाचा अल्बम पाहिल्यानंतर जो प्रश्न असतो, "की या फोटो मध्ये मी का नाही?" तो नीरज ने देखील विचारला,या प्रश्नावर बाबांनी काहीतरी उत्तर देऊन ,वेळ मारून नेली. मग लग्नातील प्रत्येक फोटो बघत बाबा निरजला त्या फोटो मागची गोष्ट ,गमतीजमती सांगू लागले. निरजही उत्साहाने प्रत्येक फोटो पाहू लागला. जसे जसे फोटो बघत होते तसे निरजचे बाबा ही त्या आठवणींत एव्हाना रमू लागले होते. प्रत्येक फोटो नजीक त्यांच्या चेहऱ्यावरचा बदलत जाणारा भाव पाहता त्याक्षणी तिथे जर कोणता फोटोग्राफर असता ,तर त्याने ते भाव त्याच्या कॅमेरात टिपले नसते तरच नवल. प्रत्येक फोटोनजीक आणि सोबतीला असलेल्या जुन्या गाण्यांच्या जोडीने बाबा अजूनच नॉस्टॉलजिक होत होते,एव्हाना नीरज ही खेळायला जाण्याऐवजी फोटो पाहण्यात रममाण झालेला होता.
त्यानंतर नंबर आला तो नीरज च्या लहानपणी च्या फोटोंचा, जेव्हा बाबांनी नीरज ला त्याचे लहानपणी चे फोटो दाखवले ,तेव्हा नीरज ला ते फोटो बघून फोटोतले लहान मूल आपणच आहोत याचा विश्वास बसेना, पण नंतर त्याला जसे जसे एक एक फोटो बाबा दाखवत गेले तसा तसा त्याला ही त्याचे फोटो आवडू लागले,मग तोच हा फोटो कधी काढला ? वगरे अस विचारू लागला. बाबा ही न थकता त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं देऊ लागले. दरम्यान असं करत करत सगळे फोटो बघून झाल्यावर ,बाबांनी ते सगळे अल्बम पुन्हा होते त्या गाठोड्यात बांधून ठेवले आणि ते गाठोडं पुन्हा माळ्यावर ठेवुन दिलं. गाठोडं ठेवल्यावर त्यांनी स्टुलावर उभा राहून खाली बघितलं असता त्यांना निरजच्या चेहऱ्यावर काहीसे प्रश्नार्थक भाव जाणवले. खाली उतरल्यावर त्यांनी चालू असलेला रेडिओ बंद केला आणि निरजला त्याच्या चेहऱ्यावरच्या प्रश्नार्थक भावांबद्दल विचारणा केली असता , नीरज त्यांना म्हणाला
"बाबा ,हे सगळे फोटो मला आधी का नाही दाखवले?"
"त्याचं काय आहे नीरज , यातला एक एक फोटो म्हणजे आठवणींचा खजिना आहे ,अन खजिना कधीतरी अचानक आपल्याला मिळाला की त्याचा जो आनंद होतो ना ,त्या आनंदातच खरी मजा असते. उद्या तू जेव्हा मोठा होशील अन तुझं लग्न होईल तेव्हा या सगळ्या फोटोंचा कोलाज करून तुला भेट द्यायचा अस मी अन तुझ्या आईने ठरवलं. तुला तेव्हा हा खजिना बघून झालेला आनंद आम्हाला दोघांनाही बघायचा होता. आज अचानक तुला हे सगळे फोटो सापडले ,तरी ते फोटो पाहत असताना तुझ्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद मला दिसत होता ,त्याच मोल जेव्हा तू बाबा होशील अन तुझ्या मुलाला जेव्हा तू त्याचे फोटो दाखवशील तेव्हा कळेल."
हे ऐकून नीरज ही काहीसा भावूक झाला होता. घरातल सारं वातावरणच एव्हाना नोस्टॉलजिक झालं होतं म्हणायला हरकत नाही. अश्यातच बाबांना पुन्हा एकदा रेडिओ ऐकण्याची इच्छा झाली. त्यांनी निरजला रेडिओ चालू करायला सांगितला.निरजने रेडिओ चालू केला त्यावर गाणं लागलं.....
यादो की बारात......
© मिहीर कुलकर्णी

(फोटो प्रतिकात्मक आहे)

1 comment:

आठवणींचे उसासे

खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...