"अरे हे बघ कुठल्यातरी फिल्म च्या ऑडिशन ची पोस्ट आलीय. जाऊन यायचं का??" मित्राने एका व्हाट्सअप्प ग्रुपवर आलेला मेसेज दाखवून विचारलं. "अरे एकवेळ तुला घेतील , मला थोडी ना घेणारेत , अन तसही मला आधी काम केल्याचा फारसा अनुभव देखील नाहीये, मी देत नाही ,तू दे हवं तर" असं म्हणून मी त्या मेसेज कडे दुर्लक्ष केलं पण मित्र मात्र ठाम होता, त्याने मला त्याच्याबरोबर नुसतं चल तर खरं ,तुला तिथे जाऊन द्यावी वाटली तर दे ,नाहीतर नुसता माझ्याबरोबर तरी चल असं म्हणून मित्र आणि मी त्या मेसेज मध्ये असलेल्या हॉटेल मध्ये पोहोचलो.
हॉटेल मध्ये पोहोचलो तर तिकडे खूप कमी लोकं होते अन त्यात जवळपास सगळे नाटकात वगरे काम करणारे बऱ्यापैकी ओळखीचेच होते , साधारणतः ४०-५० लोकं असतील जास्तीत जास्त ,नुकत्याच काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका ऑडिशन ला १२०० पेक्षा जास्त लोकं आले होते ,त्यांच्यापुढे ही गर्दी अगदी नगण्यच होती. आतमध्ये ऑडिशन चालू होतीच , फार गर्दी नाही आणि ऑडिशन सर्वांदेखत नाही हे बघून मी ठरवलं की आपण सुद्धा ऑडिशन द्यायची.
ऑडिशनसाठी माझ्यासारख्या वाट बघत बसलेल्यांपैकी एकाला विचारून मी ऑडिशन चे इतर सोपस्कार म्हणजे रजिस्ट्रेशन वगरे पार पाडले ,पण त्या सहकार्याकडून समजले की ऑडिशन साठी आपली आपली तयारी करून यायचं होत ,कोणतीही स्क्रिप्ट प्रॉडक्शन हाऊस कडून दिली जाणार नव्हती.आतापर्यंत जमवलेलं अवसान हे ऐकून गळून पडल्यासारखं झालं.कारण मी कोणतीच तयारी करून आलो नव्हतो, आता काय करायचं या विचारात पडलो असता , आठवलं की परवा ज्या ऑडिशन ला गेलो होतो ,तिथलाच पॅराग्राफ आपण करूया म्हणून ,मोबाईल मध्ये तो पॅराग्राफ शोधण्याची धडपड सुरू झाली.
काहीवेळाने मी ऑडिशन द्यायला आत गेलो तसा ,तिथे असलेले अनेक असिस्टंट डिरेक्टर्स आणि इतर ही अनेक जण बसलेले बघून जरा दडपण आलं ,पण त्यातल्या एका असिस्टंट डिरेक्टर नी विचारपूस करून ,मला ऑडिशन द्यायला सांगितलं ,हे सगळं माझ्यासाठी खूपच नवीन होतं ,सहाजिकच मला गोंधळायला झालं ,आणि पोटात गोळा तर आलाच होता त्या पायी मी घाबरलो आणि मला डायलॉग्सच आठवेनात ,तितक्यात त्या सगळ्यांनी मला पाणी वगरे दिलं आणि नर्व्हस न होण्याचा सल्ला दिला आणि मग मी काहीसा रिलॅक्स झालो आणि मग जमेल तशी ऑडिशन दिली. ऑडिशन म्हणावी तितकी चांगली नाही म्हणून काहीसा नाराज होऊन मी बाहेर पडलो आणि माझ्याबरोबर आलेल्या मित्राची ऑडिशन होईपर्यंत ,इतरांशी बोलत वेटिंग रूम मध्ये बसलो ,बाही बसलेल्यापैकीं अनेकांचं सिलेक्शन झालेलं पाहून आणि माझी ऑडिशन खराब झालेली पाहून मला वाटलं की आता गेला रोल ,अश्यातच मित्राचं देखील सिलेक्शन झालं आणि मला मी ऑडिशन देताना चुकलो याच जास्तीच वाईट वाटायला लागलं.पण का कोण जाणे मला त्यातल्या काही असिस्टंट डिरेक्टर्स च्या देहबोलीवरून काही ना काही रोल मिळेल असा वाटत होतं. पण वाटणं आणि असणं यात फरक असतो ना? जे होईल ते होईल असं म्हणून मी त्या ऑडिशन च विसरून देखील गेलो होतो.
चार - पाच दिवसांनी सकाळी सकाळी फोन खणखणला आणि माझं सिलेक्शन झालं असल्याच मला समजलं तसा माझा आनंद गगनात मावेना, आणि दुपारी लगेच स्क्रीनटेस्ट ला बोलावलं होतं,तोपर्यंत चित्रपटाचं नाव सोडलं तर बाकी काहीच माहिती नव्हती ,पण स्क्रीनटेस्ट ला गेल्यावर कॉस्च्युम वगरे सगळं चेक करून झाल्यावर मी आणि माझ्याबरोबर असणाऱ्या उत्तर कलाकारांना काही वेळाने अमुक अमुक या हॉटेल ला या असं सांगितलं पण काही वेळाने परत फोन येऊन हॉटेल वर येण्याऐवजी सरळ लोकेशन वर या तिथे तुम्हाला दिग्दर्शक काही सूचना देणार आहेत असं सांगण्यात आलं, आणि आमची पावलं वळली ते एका नाट्यगृहाकडे,जिथे आमचं शूटिंग होणार होतं.
आत गेल्यावर नाट्यगृहाला १९६१ सालच दाखवण्यासाठी सेट लावायचं ,रंगरांगोटीच काम सुरू होतं आणि थोड्याच वेळात सुरू झाली ती एक एक मोठे मोठे कलाकार आणि तंत्रज्ञ भेटण्याचा सिलसिला.
आम्ही दिग्दर्शकांना येण्यासाठी थोडासा वेळ लागणार असल्याने सेट च काम ,लायटिंग कसं केलंय हे न्याहाळायला सुरुवात केली तर तिथे एक लांब केस असलेला माणूस कामगारांना सूचना देत होता ,शिवाय हातात लेजर पॉइंटर घेऊन काही पॉईंट्स मार्क करत होता ,यांना कुठेतरी पहिलय हे आठवत होतं पण त्याचं नाव आठवत नव्हतं ,एवढ्यात आमच्या मधला एक जण म्हणाला त्यांचं नाव "प्रसाद सुतार" खूप मोठे व्हिएफएक्स सुपरव्हायजर आहेत ते ,मग सहाजिकच गूगल केलं आणि मग समजलं की त्यांनी बाजीराव मस्तानी, शिवाय ,चेन्नई एक्सप्रेस ,कट्यार काळजात घुसली यांसारख्या अनेक मोठमोठ्या सिनेमांचे व्हिएफएक्स डिझाईन केलेआहेत. हे वाचून आमची पावलं त्यांच्याकडे तत्काळ वळली आणि त्यांनी सुद्धा अजिबात मोठेपणा चा आव न आणता आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. ही होती पहिल्या कलाकाराची भेट.
त्यानंतर यशराज ,धर्मा प्रोडक्शन्स सोबत काम करणारे अजून काही तंत्रज्ञ मग ते स्टोरीबोर्ड आर्टिस्ट असतील , किंवा इतर अन्य टेक्निशियन्स यांची गाठभेट झाल्यानंतर वेळ आली ती चित्रपटाचे दिग्दर्शक यांना भेटायची ,आम्ही बसलेल्या ठिकाणी काही वेळात चित्रपटाचे दिग्दर्शक "अभिजित देशपांडे" आले. आता पुन्हा यांचं नाव ऐकल्यासारखं वाटत होतं म्हणून साहजिकच गूगल करणं आलं आणि मग कळलं की हे खूप मोठे पटकथा लेखक आहेत ,यांनी नटसम्राट ,शूटआऊट ऍट वडाळा , वझीर , FU ,टेबल नंबर २१ यांसारख्या चित्रपटांची पटकथा,संवाद लेखन केलं आहे ,आणि हा त्यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असला तरी त्याच लेखन देखील त्यांनी केलेल आहे. मग त्यांनी आम्हाला उद्या आमच्यावर चित्रित होणारा सिन समजावून सांगितला प्रत्येकाचा त्यात असलेला रोल काय हे सांगितलं आणि त्याच बरोबर त्यांनी दिलेली आनंदाची बातमी म्हणजे आमच्याबरोबर सिन मध्ये सुबोध भावे असणार आहेत हे सांगितल्यावर तर सगळ्यांचाच आनंद गगनात मावेना. सकाळी शार्प ६ ला सगळ्यांना हजर रहायला सांगून दिग्दर्शक त्यांच्या पुढच्या कामांना निघून गेले ,आणि मी व इतर कलाकार भारावलेल्या अवस्थेत घरी आलो .
दुसऱ्या दिवशी सकाळी पावणे सहालाच आम्ही सगळे पोहोचलो होतो , तेव्हा आम्हाला वाटलं की सुबोध सर येईपर्यंत आणि शूटिंग सुरू होईपर्यंत उशीर होईल आणि आपण उगाचच लवकर आलो असं म्हणून आम्ही तिथल्या खुर्च्यात बसलो तोच आमचं लक्ष गेलं की पहिल्या रांगेत काहीजण आमच्या आधीच येऊन बसलेत , ते कोण हे उत्सुकतेने बघितलं तर तिथे आमच्या खूप आधी सुबोध सर येऊन बसले होते आणि लोकेशन , आणि इतर तांत्रिक गोष्टींची पाहणी करण्यात ते गुंगलेले होते आणि इन्स्टाग्राम वरून समजलं की ते पहाटे ४ ला उठून जॉगिंग वगरे करून आणि आवरून आमच्या आधी सेट वर हजर होते यावरून एखादा कलाकार उगीच मोठा नसतो ,हे त्यावेळी पटलं.
काही वेळातच एका असिस्टंट डिरेक्टर ने येऊन ,आम्हाला व्हॅनिटी मध्ये जाऊन बसायला सांगितलं ,आणि कपडे वगरे बदलून झाल्यानंतर आम्हाला मेकअप रूम मध्ये जाऊन मेकअप करायला बसा अस सांगितलं. आमच्यापैकी ज्यांचा रोल थोडासा मोठा होता साहजिकच त्यांचा मेकअप करायला आधी सुरुवात झाली ,आणि आमचा रोल काहीसा छोटा असल्यामुळे आम्हाला नंतर घेण्यात आल पण ही गोष्ट मी व माझे एक सहकलाकार यांच्या पथ्यावर पडली कारण नंतर मेकअप रूम मध्ये एन्ट्री झाली ती साक्षात "विक्रम गायकवाड" यांची, त्यांनी स्वतः आमच्या चेहऱ्यावरून शेवटचा हात फिरवला ,आणि आम्ही भारावलेल्या अवस्थेत होतो ते इतकं की आम्हाला फोटो काढणं सुद्धा सुचलं नाही त्यात. काही वेळाने ते सुबोध सरांचा मेकअप करायला त्यांच्या व्हॅनिटी मध्ये गेले आणि सुबोध सरांनी इन्स्टाग्राम वर पोस्ट टाकली की "जेव्हा तुमच्या चेहऱ्याला विक्रम गायकवडचा हात लागतो, तेव्हा तुम्हाला व्यक्तिरेखेतल्या विठ्ठलाचं दर्शन होतं" अगदी हेच दर्शन आम्हाला काही क्षणांपूर्वीच झालं होतं.
त्यानंतर आम्हाला शूटिंग साठी बोलावण्यात आल ठरलेल्या मार्क वर उभा राहायला सांगितलं आणि काही वेळाने सहज शेजारी लक्ष गेलं तर शेजारी सुबोध सर उभे होते , पहिल्यांदा विश्वासच बसेना , कारण कलाकारांना आपण टीव्ही मध्ये पाहतो पण १ फुटापेक्षा कमी अंतरावरून पाहणं तेही वेगळ्या लुक मध्ये हा अनुभव शब्दांत वर्णन करणं कठीण आहे. त्यानंतर तिथे एक गृहस्थ कॅमेरा ऍडजस्ट करण्यात व्यस्त होते त्यावरून ते या सिनेमाचे छायाचित्रणकार आहेत हे समजलं पण ते आहेत कोण हे माहीत नव्हतं इतक्यात clap वर त्यांचं नाव वाचलं आणि ते होत "सुधीर पलसाने" त्यांनी कट्यार केला होता हे माहिती होतं पण अजून कोणकोणते सिनेमे केलेत हे माहिती नव्हतं म्हणून सहाजिकच गूगल करणं आलं ,आणि गूगल केल्यावर समजलं त्यांनी बेबी, नाम शबाना , एम.एस धोनी यांसारखे प्रचंड गाजलेले चित्रपट केलेत ,हे ऐकून तर आम्ही चक्कर येऊन पडायचंच बाकी राहिलो होतो ,इतका मोठा माणूस आपल्या चित्रपटाचा छायाचित्रणकार आहे हे बघून कोणालाही अभिमान वाटेलच, त्यांचं काम करण्याची पद्धतही खूप छान होती ,ते कॅमेरा कशाप्रकारे move होणार आहे ,कश्या प्रकारे हालचाल करायची हे सगळं ते एकदाही न चिडता अथवा रागावता नीट समजून सांगत होते ,आमची कुठे चूक झाली तर हरकत नाही आपण पुन्हा एकदा करू असं म्हणून ते आम्हाला प्रोत्साहन देत होते. अजून एक सांगायची गोष्ट म्हणजे शूटिंग जवळपास १२-१४ तास चाललं पण इतका वेळ न थकता सगळं युनिट काम करत होत अगदी पलसाने सर सुद्धा कॅमेरा पासून क्षणभर देखील हलले नाहीत. त्यानंतर जेव्हा आमचं शूटिंग संपलं तेव्हा आम्ही सगळे मेकअप उतरवून बाहेर आलो तेव्हा तिकडे बाहेर , रुद्रम मधील लाडके चंदू दादा म्हणजेच सुहास पळशीकर सर कोणाशीतरी बोलत उभे असलेले दिसले रुद्रम मधील त्यांच्या भूमिकेचा मी प्रचंड मोठा चाहता असल्यामुळे मी तात्काळ त्यांना भेटायला गेलो आणि रुद्रम मधलं काम खूप भारी आणि चांगलं झालंय वगरे हे सांगू लागलो त्यावर त्यांनी " चांगलं झालंय ना? तुम्हाला आवडतय ना?, मग झालं तर " अस म्हणून खूप चांगल्या प्रकारे माझ्याशी गप्पा मारल्या , माझ्यासोबत फोटो देखील काढला. त्या थकवणाऱ्या दिवसातला सुहास सरांशी गप्पा हा खूप सुखावणारा क्षण होता, त्यानंतर तिथे "किशोर चौघुले" पण आले त्यांच्याशी ही गप्पा मारल्या,आणि गप्पा मारत असतानाच तिथे सुबोध सर आणि अभिजित सर आले त्या दोघांनीही कोणतेही आढेवेढे न घेता आमच्या सगळ्यांसोबत फोटो काढले आणि अखेरीस तो मंतरलेला दिवस संपला , रोल खूप छोटा असला तरी तो दिवस खऱ्या अर्थाने खूप मोठा होता ,कारण आजपर्यंत ज्या कलाकारांची ,तंत्रज्ञांची नुसती नावं ऐकली होती त्या कलाकार तंत्रज्ञाना मी आज नुसतं भेटलोच नव्हतो तर त्यांच्यासोबत काम ही मी करू शकलो होतो. तर हे होते मला भेटलेले कलाकार... आणि हा होता मंतरलेला दिवस.....
©मिहीर कुलकर्णी
No comments:
Post a Comment