Monday, 10 July 2017

कथा :- कोल्ड कॉफी

"ऑफिस संपल्यावर भरगच्च  भरलेल्या आणि सर्वत्र घामाचा वास दरवळणार्या बसमध्ये चढल्यानंतर ,रविवारी सुद्धा ऑफिस ला यावं लागल्याच दुःख होत असतानाच, एका स्टॉप ला चढलेल्या जोडप्याला पाहून का कोण जाणे ,पण मनात आठवणींचा फ्लॅशबॅक सुरू झाला. तो मुलगा त्या मुलीला बसमध्ये कोणी धक्का देऊ नये या साठी घेत असलेली काळजी ,तिच्या कपाळावर आलेली केसांची बट त्याच्या हाताने नकळत तीच स्मितहास्य अनुभवत तिच्या कानाच्या मागे सरकवताना बघितल्यावर साऱ्या आठवणींचं कोलाज पटकन डोळ्यासमोर उभं राहिलं.
      आठवणींना न्याय देणं गरजेचं होतं कारण आठवणींना कुरवाळत बसल की त्या अक्षरशः पोखरू लागतात आणि त्यातून होणारा त्रास आता सहन होत नाही. मग ठरवलं आज पुन्हा त्या दिवसांसारखं जगायचं निदान काही क्षण का होईना.
      आज नेमकी लांबची बस पकडली असल्यामुळे मला त्यातल्यात्यात जवळ असणाऱ्या स्टॉप वर उतरल्यावर मला जवळपास ४-५ किमी चालत जावं लागणार होतं,पण तुझ्यासाठी त्यावेळी ही मी चालत जायला तयार होतो,अन आजही तयार आहे. रोड वर चालत असताना आपण फिरलेली सगळी ठिकाणं अक्षरशः मला खुणावत होती,तिथे अक्षरश आपण दोघे पाणीपुरी खातोय ,असा क्षणभर भासही झाला पण शेवटी भास हा भास असतो ते सत्य नसतंच मूळी. सत्य नेहमी कटू असत आजवर ऐकलं होतं,पण ते आजकाल पुरेपूर पटायला लागलंय.
       बराच काळ पायपीट केल्यावर आपलं नेहमीच कॉफी शॉप आलं. सुरुवातीला आत जायला कचरत होतो पण आठवणींना न्याय द्यायचा होता म्हणून गेलो आत बिनधास्तपणे, अन एक कोल्ड कॉफी ऑर्डर केली,अन एका कोपऱ्यातल्या रिकाम्या टेबलावर त्या कॉफी चे घुटके घेत असताना आपली पहिली भेट ,त्यानंतरच्या कित्येक भेटीत आपण त्या कॉफी शॉप मध्ये केलेली धमाल आठवली. आजची परिस्तिथी काहीही असो,पण त्यावेळेचे क्षण आपण दोघांनी पुरेपूर एन्जॉय केले,निदान मी तरी केलेच. आज गेलो असतो अस कळलं की कॉफी शॉप पाडतायेत. जिथे आपण हे सगळे क्षण एन्जॉय केले,ती जागा तो टेबल,त्या जागेच नूतनीकरण होतंय. पण इमारत नवीन  झाली तरी क्षण थोडी ना विसरता येणारेत ,कारण ते मनाच्या कोनाड्यात अगदी व्यवस्तीत मी साठवून ठेवले आहेत.
      कोल्ड कॉफी च्या एकेका घोटा नजीक तुझी आठवण , अधिकच गडद होत होती म्हणून मी लवकरच कॉफी संपवून तिथून बाहेर पडलो. तसा कॉफी शॉप समोरचा कट्टा खुणावू लागला,खूप वेळ तिकडे मारलेल्या गप्पा,गप्पा मारता मारता एकमेकांना दिलेली टाळी ,सगळं आज जाणवत होतं,क्षणभर हातावर टाळीचा स्पर्षदेखील झाला,पण तो सुद्धा भास होता. आज का कोण जाणे कोल्ड कॉफी पिताना पण खूपदा तुझा भास झाला,कदाचित माझ्या मनात तुझी प्रतिमा इतकी स्पष्ट आहे आणि तुझं अस्तित्व ही इतकं गहीरं आहे की की हे असे भास सारखे होत असतात. आज एकट्याने पहिल्यांदाच कोल्ड कॉफी प्यायली या आधी कोल्ड कॉफी हा प्रकार मला तुझ्यामुळेच समजला होता ,आणि तुझ्याचमुळे आवडला होता. आता खरं आवडलं कोण होत? कोल्ड कॉफी का तू ? या प्रश्नाचं उत्तर सहाजिकच तू अन तुझ्यामुळे कॉफी हे असल्यामुळे असे प्रश्न सहसा नाही उदभवत आजकाल. आजकाल फक्त आठवणी खूप त्रास देतायत,पण या ठिकाणी आज येऊन आपण करायची ती सगळी धमाल ,सगळ्या गोष्टी आज एकट्याने कराव्या लागतायेत याच दुःख ही होत,पण आज मी ते दरवेळीसारखं एन्जॉय पण केलं निदान अशी मनाची समजूत तरी घातली.
      असो आजकाल तुझं नसणं मला त्रासदायक ठरतंय,पण त्यावर काळ हे एकच औषध आहे,काळाच्या ओघात ते त्रास देखील देणार नाही,पण आठवणी ते काही पुसून टाकू शकणार नाही याची मला खात्री आहे. तुला फक्त एवढंच म्हणेन तू आहेस तिथे या साऱ्या आठवणी तुदेखील एन्जॉय करतच असशील याची मला खात्री आहे,पण या कोल्ड कॉफी ची चव आपण घेत असताना जशी लागायची तशी आज तू नसताना लागत नाही ,हीच के ती खंत मला वाटतेय.""
…...................................
हा मेल लिहून झाल्यावर सेंड करायची वेळ आली तेव्हा मात्र त्याच मन धजावेना ,मग त्याने मेल ड्राफ्ट ला टाकला आणि लॅपटॉप ची स्क्रीन फोल्ड करून लॅपटॉप बंद केला.लॅपटॉप बँद करताना त्याने एक नजर टाकली तर तिथे असे तिला पाठवायचे म्हणून ड्राफ्ट केलेलं असंख्य मेल्स होते. पण याची एकदाही तिला सेंड करायची हिंमत झाली नाही.आजही त्याला कधीतरी खूपच आठवण आली तर तो जातो अन पिऊन येतो त्यांची नेहमीच्या ठिकाणची
कोल्ड कॉफी......
©मिहीर कुलकर्णी

3 comments:

आठवणींचे उसासे

खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...