Monday, 14 August 2017

कथा :- तो दिवस


       नेहमीसारखीच ती संध्याकाळ होती. पण आज आमच्या नव्याने निर्माण झालेल्या व्हाट्सप्प ग्रुप मधल्या काही जणांनी भेटायचं ठरवलं होतं. ठरल्याठिकाणी आणि ठरल्यावेळी एक एक करून सगळे जमले,अन मग चालू झाल्या इकडच्या तिकडच्या गप्पा, मग काहीवेळाने तो आला,आल्यावर काही वेळातच त्याने त्याच्या वागण्याबोलण्याने मला आणि ग्रुपमधल्या जमलेल्या सगळ्यांना आपलंसं करून घेतलं होतं. जनरल हाय हॅलो झाल्यावर सगळे जण आपपल्यात रमले ,तस मी अन तो एक कोपऱ्यातल्या टेबल वर कॉफी पिट बसलो , पण का कोण जाणे ,त्यावेळी मला काहीस वेगळं जाणवत होतं. त्यादिवशीची भेट संपली पण खरतर ती संपूच नये असं वारंवार वाटत होतं.
      मग काय त्याचा मेसेज कधी येतो ,याचीच वाट बघू लागले. पण त्याचा मेसेज काही येईना ,मग न राहवताच मीच त्याला मेसेज केला. काहीही कारणं काढून बोलायला सुरुवात केली.मग एकदा दोघेच भेटायचं का? असं त्याने विचारलं . पुढचा मागचा विचार न करता लगेच तयार झाले. भेटलो, बोललो,कॉफी प्यायली,पण का कोण जाणे त्याच लक्ष माझ्या डोळ्यांवरून काही केल्या हटतच नव्हतं. मग दोन दिवसांनी पुन्हा भेटायचं का असा त्याचा मेसेज आला ,असं वारंवार भेटणं ,बोलणं सुरू झालं,आता एव्हाना मलाही तो आवडायला लागला. एकेदिवशी असच भेटलो असता त्याने बोलता बोलता चक्क प्रपोज केलं, मी ही पटकीनी हो म्हणून टाकलं. मला तर तो आवडत होताच ,अन त्यालाही मी आवडते हे कळल्यावर मी ही विचार न करता हो म्हणून टाकलं.
       आमच्या दोघांचं कॉलेज वेगवेगळ असलं,तरी सुटण्याची वेळ एकच होती ,मग तो मला कॉलेज मध्ये घ्यायला यायचा,अन मग आम्ही तिथून कुठेतरी जाऊन थोडावेळ बसून घरी जायचो,असा दिनक्रम झाला होता. मला ही हे सगळं आवडायला लागलं होतं. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवलं की मी आता सर्वात सुरक्षित आहे अस वाटायचं. घरीसुद्धा आईबाबांपुढे मी त्याच इतकं कौतुक करायचे की एकदा त्यांनी मला त्याला घरी बोलवायला सांगितलं. मी बोलावलं,पहिल्यांदा त्याने आढेवेढे घेतले पण नंतर तो आला. आईबाबांशी खूप छान गप्पा मारल्या,आईबाबांना ही त्याला भेटून बरं वाटलं.
      दिवसांमागून दिवस असेच मजेत सरत होते. आताशा आमचं बोलणं सगळ्या गोष्टींवर होतं होत. पण त्याच्या घरच्यांना त्यानी मला अजून भेटवलं नव्हतं. मलाही त्याच्या घरच्यांना भेटायची खूप इच्छा होती. मी त्याला तस म्हणाले देखील. त्यावर तो जरासा चिडला माझ्यावर,मग दोन दिवस बोललाच नाही, घ्यायला ही आला नाही.मग तिसऱ्या दिवशी आला ,आणि म्हणाला चल माझ्या घरी आज आईला भेटवतो तुला. हे ऐकून मला आनंद झाला.
      घरी पोहोचलो अन पाहिलं तर घराला कुलूप होत,हे बघितल्यावर तो म्हणाला ,आई इकडेच कुठेतरी गेली असेल,दुकानातून काहीतरी आणायला,आपण आत जाऊन बसूया येईलच ती इतक्यात. आम्ही आत जाऊन बसलो,त्याने घर दाखवतो म्हणून मला त्याच्या मागे यायला सांगितलं,पण का कोण जाणे बराच वेळ झाला आणि त्याची आई आली नाही हे बघून आता मला कसतरी होतं होत. तितक्यात त्याने ही बघ माझी बेडरूम असं म्हणत त्याने बेडरूम दाखवली.
   त्याच्या बेडरुम मधे शिरताच का कुणास ठाऊकपण एक वेगळाच विचार मनाला शिवून गेला...किती सुंदर होती ती खोली...ऐसपैस...खेळती हवा आणि  सुर्यप्रकाशाचा वावर मनाला सुखावत होता...
मी खोली बघत असतानाच ,मागे दार बंद केल्याचा आवाज आला तसा खोलीतला अंधार वाढायला लागला. हळूहळू त्याच्या नजरेतला बिभत्स हापापले पण मला जाणवायला लागलं....तो जवळ येताना खोलीतली खेळणारी हवा कुठेतरी दूश्र जाऊन लपून बसली होती...रुसून की त्याच्या नजरेत दिसणाऱ्या राक्षसाला घाबरुन देव जाणे...खोलीतला कोंदट पणा आता जाणवायला लागला होता...त्यातच त्याने दिलेल्या धक्कयाने मी त्याच्याच बेडवर धाडकन कोसळले. तसा त्या चादरीतला दर्प नाकात गेला...तिथे मला सुचत नव्हतं काय करू...मग मीच डोक्याला एक झटका दिला आणि मनात ठरवलं नाही आपल्याला याच्या तावडीतून सुटायलाच हवं...आणि लगेचच मनाने प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतात तशी एक लाथ झाडली त्याच्या पेकाटात...तो लांब जाऊन पडला वेडा वाकडा...तो विव्हळत होता हे बघून खोल कुठेतरी गलबलून आलं मला...पण आता तो माझा "तो" नव्हता...म्हणून मी निग्रह करून दरवाज्याच्या दिशेने धाव घेतली...दाराच्या फटीतून दिसणारा प्रकाश मला खुणावत होता...मी दार उघडलं तशी ती खेळणारी हवा लगेचच जवळ आली...जणू मला या सगळ्यातून बाहेर न्यायलाच आली होती...मी धावत घरा बाहेर पडले आणि  तिथे परत कधी न जायचा निश्चय केला तो कायमचाच...
परत खुपदा त्याचे फोन आले माफी मागण्यसाठी पण मी ना त्याच्या फोन ला भिक घातली ना त्याच्या माफीच्या नाटकाला...नंतर नंबर बदलून टाकला...
आजही तो दिवस आठवला की अंगावर येतात त्या आठवणी....
लेखन :- मिहीर कुलकर्णी

1 comment:

  1. अप्रतिम लिखाण, वास्तववादी कथा, मुलीचा योग्य निर्णय आणि धाडस या सर्वांच कौतुक ������

    ReplyDelete

आठवणींचे उसासे

खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...