Wednesday, 12 April 2017

कोवळीक


      दोन मित्रांनी आवर्जून वाच असे सांगितल्यानंतर आणि सध्या सुट्टी चालू असल्यामुळे ,आता तो योग्य क्षण आलाय याचा साक्षात्कार झाला आणि तडक लायब्ररी मध्ये जाऊन "कोवळीक" आहे का? असा प्रश्न केला,आणि बऱ्याच शोधानंतर म्हणजे महत्प्रयासाने म्हणायला हरकत नाही "कोवळीक" हाती पडलं.आधीच मित्रांनी सांगितल्यामुळे आणि सुहास शिरवळकर यांच्या आधी वाचलेल्या दुनियादारी,मर्मबंध,नॉट गिल्टी, या सारख्या पुस्तकांमुळे ,हि कादंबरी दर्जेदार असणार यात वादच नाही हे ठाऊक होतं आणि मग निवांत वेळ मिळाल्यावर कादंबरी वाचायला घेतली.

        खरं तर कोवळ्या वयातील प्रेमकथा आजकाल खूपच चर्चेचा विषय बनला आहे,यावर बनलेल्या चित्रपटांनी तर करोडोंची कमाई सुद्धा केलीय,पण या चित्रपटांमधून दाखवले जाणारे चित्रण हे काहीसं Fiction या प्रकारात मोडत ,पण प्रत्यक्षात मात्र असं काहीच घडत नसत त्यामुळेच "Reality is much stranger than Fiction" हे प्रामुख्याने अधोरेखित करणारी ही कादंबरी आहे असं मला वाटतं. कथा सुरु होते ती सत्यजित च्या कॉलेज प्रवेशापासून,कॉलेज प्रवेशावेळी थत्ते सरांनी त्याच्यावर ठेवलेला विश्वास जेव्हा कॉलेज सुरु झाल्यावर काहीच दिवसात तो विश्वासाला पात्र न ठरता वहावत जात असताना,थत्ते सरांनी त्याला वेळीच सावध करणं ,त्याने लगेच सावध होणं आणि स्वतःला सरांच्या विश्वासाला पात्र होऊन चांगले मार्क पाडणं, त्यातून सरांच्या मुलीची म्हणजेच कथेतील पहिली नायिका कीर्ती ची होणारी भेट,तिच्या सोबत जुळणारे प्रेमसंबंध असोत,आणि हे प्रेमसंबंध एका मर्यादेच्या पुढे न जाऊ देणे याची पुरेपूर घेतलेली काळजी असो.हे सगळं पौगंडावस्थेतल्या मुलांना कथेच्या माध्यमातून केलेलं मार्गदर्शनच म्हणायला हरकत नाही.प्रेम हे जो पर्यंत एका मर्यादेत असतं तो पर्यंत त्याची मजा काही और असते ,अश्यावेळी चुकून जर प्रेमात मर्यादा ओलांडली गेली तर त्या प्रेमाचं कुस्करी व्हायला वेळ लागत नाही,आणि प्रेमाची जागा जेव्हा वासना घेते त्यावेळी काय होत याच तंतोतंत चित्रण या कथेत करण्यात आलं आहे.कथेची दुसरी नायिका असो नायकाचा तिच्यावर जडलेलं प्रेम असो ,मग तिने नायकाच्या भल्यासाठी घेतलेला एक कठोर निर्णय असो,सारं कसं वाचता वाचता माणूस त्यात पूर्णतः रमून जातो,आणि कदाचित त्यातल्या गोष्टींशी स्वतःच्या आयुष्यातल्या गोष्टींशी जुळवू लागतो आणि कधी कधी त्याला त्यात बरीच समानता आढळून येत असते,आणि त्यामुळे त्याला ती कथा ,त्यातली पात्रे अजूनच जवळची वाचू लागतात,तसंच काहीसं या कथेच्या बाबतीत होतं.

        "विलग झालेल्या डाळिंबी ओठांवर हाताचा नाजूक पंजा पालथ्या बाजूने विसावलेला.घारे-घारे टप्पोरे डोळे विस्फारीत झालेले. त्यावर पापण्यांचे पडदे पडतायेत-वर उचलले जातायेत"

या शब्दात केलेलं नायिकेचे वर्णन असो किंवा

"त्या 'टर्रर्र आवाजानं त्याच्या सगळ्या धाडसालाचं भोक पडलं होतं जणू.जरा भान हरपून भावना हेलावून सोडणारे चार शब्द बोलू म्हटलं तर सारखं ते भोक रुंदावून आणखी दात विचकत असल्याचा भास व्हायचा अन मग मनात जुळत असलेली वाक्य गळून पडायची"

एका प्रसंगाचं असं केलेलं वर्णन,नकळत डोळ्यासमोर सगळे प्रसंग उभे राहतात,आणि आपण हे पुस्तक एकदा घेऊन बसलो कि पूर्ण वाचून संपल्याशिवाय मनाला चैन पडत नाही,अन पुस्तक वाचून झालं की नकळत हि कथा ,यातल्या नायकाची व्यथा आणि या कथेचा शेवट मनाला चटका लावून जातो..आणि मनात खोलवर घर करून राहते ती ही "कोवळीक"..

©मिहीर कुलकर्णी

No comments:

Post a Comment

आठवणींचे उसासे

खूप दिवसांनी आज रूम ची खिडकी उघडली . बऱ्याच दिवसांनी उघडल्यामुळे धूळ आणि सिगारेटची ऍश यामुळे ती खिडकी जाम झाली असावी पण महत्प्रयासाने उघडली ...