अर्धवट शुद्ध असलेल्या अश्या अवस्थेत तो डोळ्यांची उघडझाप करत होता.डोळ्यांची उघडझाप करत असताना अंधूक अशाप्रकारच्या दृश्यात त्याला त्याच्या डाव्या हातात कोणीतरी सुई खूपसत असल्याचं त्याला भासल.वास्तविक पाहता हातात सुई खुपसून घेणं त्याच्यासाठी अजिबातच नवीन नव्हतं,कारण जन्मतःच काही मिनिटातच काचेच्या पेटीत त्याच्या नाजूकश्या हातात सुई खूपसली गेली होती.तिथून पुढे जेव्हा जेव्हा ऋतुबदल होत असे तेव्हा तेव्हा त्याची अन सुई ची गाठ अगदी नित्य नियमाने होत असे.सुरुवातीला त्याला हे सुई वगरे टोचून घेणं अगदीच जीवावर येई पण ती टोचली नसती तरीदेखील जीवावरच येणार होत.मग नाईलाजास्तव तो टोचून घेण्यास तयार होत असे.मात्र पुढे पुढे त्याला याची सवय झाली म्हणा किंवा अजून काही सुई टोचून घ्यायची म्हणली कि तप सदैव तयार असे.कारण ती सुई फक्त सुई राहिली नव्हती तर कालांतराने तीच त्याची एकमेव सखी बनली होती.त्याने दवाखाना ,तिथले कर्मचारी,औषध ,गोळ्या, आणि सुई यांनाच त्याच कुटुंब ,मित्र सारं काही मानलं होत, त्याला जेव्हा जेव्हा गरज होती त्यावेळी त्याला या लोकांनीच त्याला आपलं मानलं ,त्याला साथ दिली असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.
पौगंडावस्थेतील मुलाला साधारणपणे एखाद्या मुलीच्या स्पर्शाचे प्रचंड आकर्षण असते,सगळ्यांना तो स्पर्श हवाहवासा वाटत असतो,यालाही हवा होता,पण याच्या नशिबात स्पर्श होता तो फक्त सुई चा.पण त्याने या स्पर्शात सुद्धा धन्यता मानली नव्हे नव्हे तर हा च स्पर्श स्त्रीस्पर्श मानला आणि मनाच्या इच्छेची पूर्तता केली.मध्यंतरी त्याच आजारपण एकाएकी थांबलं ,पण त्याचा याला आनंद होण्याऐवजी कसतरीच वाटू लागलं.एखाद्या गोष्टीची सवय होणे याला आजारपण किंवा दुःख या गोष्टीही अपवाद नाहीत हे त्याला तेव्हा समजलं.पण आज पुन्हा त्याला सुई चा स्पर्श होतोय ,पण आज होणार हा स्पर्श कदाचित शेवटचा असू शकेल कारण आज तो शेवटच्या घटका मोजतोय आणि आजही त्याच्या साथीला त्याच म्हणावं असं कोणीच नाही फक्त त्याच्याशी एकरूप झालेली सुई सोडून......
©मिहीर कुलकर्णी
No comments:
Post a Comment